Home आरोग्य पूर्वसूचनेशिवाय ६० ते ८० कामगार कमी; राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलन छेडण्याचा इशारा

पूर्वसूचनेशिवाय ६० ते ८० कामगार कमी; राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलन छेडण्याचा इशारा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्वच्छता व दैनंदिन कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या स्मार्ट कंपनीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त होत असून, कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यासह कमी करण्यात आलेल्या ६० ते ८० कामगारांना तात्काळ पुन्हा कामावर घेण्याची मागणी माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी केली आहे. याशिवाय रुग्णालयात न्युरोसर्जनची नियुक्ती तातडीने करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्वच्छता तसेच इतर दैनंदिन सेवा पुरविण्याचे कंत्राट स्मार्ट कंपनीला देण्यात आले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून संबंधित कंपनीकडून रुग्णालयातील स्वच्छता वेळेवर होत नसल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर साई मल्टी सर्व्हिसेस अंतर्गत काम करणाऱ्या अनेक कामगारांचे काम अचानक बंद करण्यात आले असून, त्यामुळे सुमारे ६० ते ८० कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कामगारांना कमी केल्यामुळे रुग्णालयातील स्वच्छता व अन्य महत्त्वाची कामे मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असल्याचे सांगण्यात आले. परिणामी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. कोरोना काळापासून सातत्याने सेवा देणाऱ्या अनेक कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

तसेच संबंधित कंपनीकडून सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक वसुली करण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कमी करण्यात आलेल्या साई मल्टी सर्व्हिसेसच्या कामगारांना तात्काळ पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, अन्यथा कामगार आपल्या कुटुंबीयांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डीन कार्यालयासमोर उपोषणाला बसतील, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार योग्य वेतन देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्याला तीन मंत्रीपदे असतानाही जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्याप न्युरोसर्जनची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने गंभीर रुग्णांचे मोठे हाल होत असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. न्युरोसर्जन उपलब्ध नसल्याने रुग्णांना इतर शहरांमध्ये हलवावे लागत असून त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. तातडीने न्युरोसर्जनची नियुक्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक राजु मोरे, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत आणि माजी नगरसेवक सुनील माळी यांनी दिला आहे.


Protected Content

Play sound