
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज पुन्हा एकदा जोरदार धडाका लावला. सोमवार २५ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील तीन मुख्य भागांत वेगवेगळ्या तीन पथकांनी एकाच वेळी धडक कारवाई केली. या मोहिमेत रस्त्यावर अवैधपणे लावलेल्या हातगाड्या आणि इतर व्यावसायिक साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक संजय ठाकूर यांनी दिली.

गेल्या महिन्याभरापासून महापालिकेने शहरात व्यापक अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेतली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील समांतर रस्त्यावरील अतिक्रमणे हटवल्यानंतर, प्रशासनाने आपला मोर्चा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या फुले मार्केट आणि रेल्वे स्टेशन परिसराकडे वळवला. फुले मार्केटमध्ये काही फेरीवाल्यांनी आणि दुकानदारांनी रस्त्यावर अवैध दुकाने थाटल्यामुळे मूळ दुकानदारांनी व ग्राहकांनी मनपाकडे तक्रारी केल्या होत्या. १५ दिवसांपूर्वी येथे कारवाई झाली होती, मात्र पुन्हा अतिक्रमण झाल्याने आज पथकाने पुन्हा कारवाई करत येथील साहित्य जप्त केले. आता हा परिसर कायमचा अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी तिथे एक विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.
दुसरीकडे, रेल्वे स्टेशनसमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात वाहनधारकांनी आणि दुकानदारांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते. यामुळे रेल्वे प्रवाशांना ये-जा करणे कठीण झाले होते. आजच्या कारवाईमुळे या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. शहराचे विद्रुपीकरण आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण यापुढेही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.



