Home Cities जळगाव अदिती तटकरे यांचा गायकवाड यांना वरदहस्त आहे का? ; रोहिणी खडसे यांचा...

अदिती तटकरे यांचा गायकवाड यांना वरदहस्त आहे का? ; रोहिणी खडसे यांचा गंभीर आरोप 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महिला व बालविकास विभागातील कथित गैरप्रकारांवरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे  यांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या खाजगी सचिव राजेश गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिला अधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत बोलणे, धमक्या देणे तसेच बदल्यांचे रॅकेट चालविण्याचे आरोप करत रोहिणी खडसे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे खाजगी सचिव राजेश गायकवाड यांच्याविरोधात अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. जळगाव जिल्हा महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांनी देखील मुख्यमंत्रीांकडे लेखी तक्रार केल्याचा दावा त्यांनी केला. महिला अधिकाऱ्यांशी अपमानास्पद व अश्लील भाषेत संवाद साधणे, नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या देणे तसेच मोठ्या आर्थिक व्यवहारांद्वारे बदल्यांचे रॅकेट चालविण्याचे गंभीर आरोप त्यांनी यावेळी केले.

महिला आणि बालविकाससारख्या संवेदनशील विभागात अशा प्रकारच्या तक्रारी समोर येणे धक्कादायक आणि निंदनीय असल्याचे रोहिणी खडसे यांनी म्हटले. २०१९ पासून राजेश गायकवाड हे या विभागात खाजगी सचिव म्हणून कार्यरत असल्याचे सांगत, अनेक महिलांनी यापूर्वीही त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, इतक्या तक्रारी असूनही मंत्री अदिती तटकरे यांनी कोणतीही ठोस कारवाई का केली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

रोहिणी खडसे यांनी यावेळी थेट प्रश्न उपस्थित करत, “राजेश गायकवाड यांना मंत्री अदिती तटकरे यांचा वरदहस्त आहे का? त्यांच्यात काही आर्थिक लागेबांधे आहेत का? या प्रश्नांची उत्तरे राज्यातील जनतेला मिळाली पाहिजेत,” असे वक्तव्य केले. या आरोपांमुळे महिला व बालविकास विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, या आरोपांबाबत मंत्री अदिती तटकरे किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, विरोधकांनी या प्रकरणात पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.

महिला अधिकाऱ्यांच्या सन्मानाशी संबंधित प्रश्न उपस्थित झाल्याने हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले असून, आता राज्य सरकार या आरोपांवर काय भूमिका घेते आणि चौकशीबाबत कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound