
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आणि शेतमाल वाहतुकीसाठी पुरेसे डिझेल उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर तब्बल चार तास घेराव आंदोलन केले. दुपारी चार वाजेपासून सुरू झालेले हे आंदोलन संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत सुरू होते. या काळात जिल्हाधिकारी कार्यालयातील एकही शासकीय वाहन बाहेर जाऊ देण्यात आले नाही. आंदोलनामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती.

जिल्ह्यात सध्या डिझेल टंचाईची समस्या गंभीर बनली असून त्याचा थेट परिणाम शेती क्षेत्रावर होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. ट्रॅक्टर, मळणी यंत्रे तसेच शेतीमाल वाहतुकीसाठी लागणाऱ्या वाहनांना डिझेल मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. आगामी काळात शेतीची मशागत आणि पेरणीची कामे विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
आंदोलनादरम्यान प्रशासनाशी चर्चा करण्यात आली. यावेळी शासनाकडून उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. मात्र, जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर संपूर्ण जिल्ह्यातील तहसील कार्यालये आणि इतर शासकीय कार्यालयांबाहेर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच कोणत्याही शासकीय अधिकारी, आमदार किंवा खासदारांची वाहने जिल्ह्यात फिरू दिली जाणार नाहीत, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, वाय. एस. महाजन, मंगला पाटील, अशोक लाडवंजारी, रमेश पाटील, संग्रामसिंह सूर्यवंशी, रिकू चौधरी, सुनील माळी, राजू मोरे, किरण राजपूत, मजर पठाण, गौरव वाणी, संजय पाटील, आकाश हिवाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
शेतकऱ्यांच्या डिझेल प्रश्नावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.



