Home उद्योग जळगावात दिव्यांगांसाठी व्यावसायिक पुनर्वसन व करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात 

जळगावात दिव्यांगांसाठी व्यावसायिक पुनर्वसन व करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिव्यांग बांधवांना रोजगार, स्वयंरोजगार आणि करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने जळगावात विशेष व्यावसायिक पुनर्वसन व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव संचलित ‘जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र’ आणि भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयांतर्गत कार्यरत ‘नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर, मुंबई’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे उत्साहात पार पडले.

या शिबिराला जळगाव जिल्ह्यातील अनेक दिव्यांग बांधव आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास, स्वयंरोजगाराच्या योजना आणि शासकीय सुविधांबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली. दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेनन, चेअरमन मंगला ठोंबरे, किशोर साखळे, योगेंद्र कुशवाह, जी. टी. महाजन, मुकुंद गोसावी तसेच ‘उडान’ संस्थेच्या हर्षाली चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग युवक-युवतींना शिक्षण, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर करिअर घडविण्याचे आवाहन केले.

शिबिरामध्ये विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधींबाबत माहिती देण्यात आली. तसेच दिव्यांगांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. करिअर निवड, व्यावसायिक प्रशिक्षण आणि पुनर्वसन प्रक्रियेबाबत उपस्थितांच्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरे दिली.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या टीमने विशेष मेहनत घेतली. एस. पी. गणेशकर, अक्षय महाजन आणि गणेश पाटील यांनी नियोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा चव्हाण यांनी नेटकेपणाने केले, तर शेवटी उपस्थित सर्वांचे आभार राजकुमार माने यांनी मानले.


Protected Content

Play sound