
नशिराबाद -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासनाने जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर केलेले जळगाव तालुक्याचे ‘अप्पर तहसील कार्यालय’ नशिराबाद शहरात मंजूर करून शहराला त्याचे गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी जाहीर मागणी नशिराबाद नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आणि शिक्षण, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सभापती *पंकज शामकांत महाजन* यांनी केली आहे. या संदर्भातील सविस्तर मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना प्रत्यक्ष भेटून सादर केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पंकज महाजन यांनी म्हटले आहे की, नशिराबाद हे ऐतिहासिक वारसा लाभलेले एक जुने व महत्त्वाचे शहर आहे. ब्रिटिश काळात नशिराबाद हे ‘परगणा’ असलेले गाव होते. त्या काळात या ठिकाणी तहसील कार्यालय, न्यायालय आणि अगदी फाशी देण्याची सुद्धा व्यवस्था अस्तित्वात होती. ब्रिटिश कालखंडात संपूर्ण परिसराचे व्यापाराचे केंद्र आणि महसुली कामांचे मुख्य ठिकाण म्हणून नशिराबाद ओळखले जात होते. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जळगाव तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विस्तार वेगाने वाढला आणि नशिराबादचे हे केंद्र जळगावकडे स्थलांतरित झाले.
प्रशासकीय कामांची संथ गती आणि शासनाचा निर्णय
सध्या जळगाव तालुक्याचा विस्तार कमालीचा वाढला आहे. त्यामुळे जळगाव येथील महसूल कार्यालयांवर कामाचा प्रचंड ताण पडत असून नागरिकांच्या महसुली कामांमध्ये मोठी दिरंगाई होत आहे. महसूल प्रशासनाचे काम अधिक गतीने आणि लोकाभिमुख व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने *२ एप्रिल २०२६* रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केला आहे. या निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर आणि जळगाव तालुक्यासाठी *’अप्पर तहसील कार्यालय’* स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
नशिराबाद शहरात कार्यालय झाल्यास ५० हून अधिक गावांना फायदा
नशिराबाद येथे नुकतीच नगरपरिषद स्थापन झाल्याने या शहराचा विकास वेगाने होत आहे. जळगाव तालुक्यासाठीचे हे अप्पर तहसील कार्यालय जर नशिराबाद शहरात सुरू झाले, तर शहरालगत असलेल्या अनेक गावांना त्याचा मोठा फायदा होईल. यामध्ये प्रामुख्याने:
उमाळा, देव्हारी, चिंचोली, धानवड, धानवड तांडा, कुसुंबे खुर्द, कढोली, रायपूर, मण्यारखेडा, बेळी, निमगाव, भागपूर, जळगाव खुर्द, तिघ्रे, खिर्डी, कडगाव, कानसवाडे, शेळगाव, देऊळवाडे, भोलाणे, सुजदे, भादली बुद्रुक, आसोदा, तरसोद, ममुराबाद, इदगाव, आवार, तुरखेडे, धामणगाव, खापरखेडा यांसह जवळपास ५० हून अधिक गावांना महसुली कामांसाठी नशिराबाद हे मध्यवर्ती आणि अत्यंत सोयीचे ठिकाण ठरेल.
जागेची अडचण भासणार नाही; नगरपरिषद जागा देण्यास तयार!
पंकज महाजन यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, या अप्पर तहसील कार्यालयासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय जागा *नगरपरिषद नशिराबादतर्फे विनामूल्य उपलब्ध करून दिली जाईल.* त्यामुळे शासनाला जागेचा कोणताही प्रश्न भेडसावणार नाही. नशिराबाद शहराला त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि गतवैभव परत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने पुढील कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
या मागणीच्या निवेदनावर उपनगराध्यक्ष पंकज शामकांत महाजन यांच्यासह राहुल चौधरी, रवींद्र संतोष चौधरी, मुरलीधर गोविंदा पवार, निवृत्ती कोळी, केशव संजय गोसावी, भूषण भाऊराव कोळी आणि संदीप विष्णू पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



