जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसी परिसरातील कोगटा दाल मिल येथे गुरुवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर वर्मा यांनी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. एमआयडीसीतील अग्रवाल दाल मिलसमोर असलेल्या सेक्टर ई-9 मधील कोगटा दाल मिलमध्ये अचानक आग भडकली होती. माहिती मिळताच अग्निशमन विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल झाला.

अग्निशमन केंद्र अधिकारी भारत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालक अक्षय नाईक, नंदू खडके, देविदास सुरवाडे, संतोष तायडे तसेच फायरमन विजय पाटील, पन्नालाल सोनवणे, रोहिदास चौधरी, सौरभ चिकटे, पंकज पाटील, इकबाल तडवी, लखन माळी, योगेश पाटील, विकी सोनवणे, शेख, सुमित साबळे, नितीन राठोड आणि सचिन कोळी यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
आगीची तीव्रता मोठी असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास ५ तास लागले. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे काम करत होते. या मोहिमेसाठी दोन अग्निशमन गाड्या आणि एक ब्राउझर वाहन अशा एकूण तीन वाहनांचा वापर करण्यात आला.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आगीत मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून खाक झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



