अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशा करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला म्हणून एका पतीने आपल्याच पत्नीवर चाकूने (गुप्तीने) वार करून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील धार येथे घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजश्री राहुल भिल्ल (वय २०, रा. धार, ता. अमळनेर) ही घरकाम करून आपले जीवन जगते. तिचा पती राहुल रोहिदास भिल्ल याला नशेचे व्यसन आहे. १८ मे रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास राहुल याने नशा करण्यासाठी तेजश्रीकडे पैशांची मागणी केली. मात्र, तेजश्रीने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून संतप्त झालेल्या राहुलने तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

एवढ्यावरच न थांबता, राहुलने जवळ असलेली गुप्ती काढून तेजश्रीच्या पाठीच्या मध्यभागी डाव्या बाजूला सपासप वार केले. या हल्ल्यात तेजश्री गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली. घटनेनंतर घाबरलेल्या तेजश्रीने रात्री तिच्या काकांचे घर गाठले. दुसऱ्या दिवशी गावातील डॉक्टरांकडे प्रथमोपचार घेतल्यानंतर, प्रकृती बिघडल्याने तिला ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे दाखल करण्यात आले. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



