जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस भरतीचा सराव करून रात्री घराकडे परतत असलेल्या एका २० वर्षीय तरुणीचा किरकोळ कारणावरून रस्ता अडवून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील एका भागात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निनाद महादेव कोळी (रा. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणी ही पोलीस भरतीची पूर्वतयारी करत आहे. नेहमीप्रमाणे १९ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ती पोलीस भरतीचा सराव करून तिच्या घरासमोरील रस्त्याने पायी परत जात होती. ती घराच्या जवळ पोहोचली असता, संशयित आरोपी निनाद कोळी याने तिला पाठीमागून येऊन गाठले. “तू माझ्या बांधकाम केलेल्या ओट्यावर पाय का ठेवला?” अशी विचारणा करत त्याने तरुणीशी वाद घालण्यास सुरुवात केली.

यावर पीडित तरुणीने, “तुम्ही तुमचा ओटा व्यवस्थित बघून घ्या, मी ओट्यावर पाय ठेवलेला नाही,” असे शांतपणे सांगितले. तरुणीच्या या उत्तराचा राग आल्याने संशयित आरोपी निनाद याने संतप्त होऊन तिला रस्त्यावर अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मुलीला शिवीगाळ होत असल्याचे पाहून तिची आई मध्यस्थी करण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी तिथे धावून आली. मात्र, संशयित आरोपीने तरुणीच्या आईलाही शिवीगाळ केली.
एवढ्यावरच न थांबता, संशयित आरोपीने तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे अत्यंत अश्लील आणि लज्जास्पद कृत्य केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेसंदर्भात पिडित तरुणीने तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी निनाद महादेव कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.



