Home Cities जामनेर जामनेरमध्ये पेट्रोल-डिझेल टंचाई तीव्र ; वाहनधारकांच्या पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा

जामनेरमध्ये पेट्रोल-डिझेल टंचाई तीव्र ; वाहनधारकांच्या पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा


जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल टंचाईची समस्या गंभीर बनली असून, उपलब्ध इंधनासाठी वाहनधारक आणि शेतकऱ्यांना भर उन्हात तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपल्याने ज्या ठिकाणी पेट्रोल किंवा डिझेल उपलब्ध आहे, त्या पंपांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून शासनाने तात्काळ इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पंपसेट आणि शेतीच्या इतर यंत्रांसाठी डिझेलची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. मात्र पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरवठा अपुरा असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भर उन्हात लांबच लांब रांगा लागत असल्याने नागरिकांचे हाल होत असून अनेक ठिकाणी वादविवाद आणि गोंधळाच्या घटनाही घडत आहेत.

वाहनधारकांनी सांगितले की, काही पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागत आहेत. अनेक वेळा काही तास प्रतीक्षा करूनही इंधन मिळत नसल्याने नागरिकांना निराश होऊन परत जावे लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर याचा मोठा परिणाम होत आहे. पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम जाणवत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

शेतकरी वर्गाने प्रशासन आणि शासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. शेती हंगामाच्या पार्श्वभूमीवर डिझेलची उपलब्धता सुरळीत न झाल्यास कृषी कामांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काही नागरिकांनी कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याचा संशय व्यक्त करत संबंधित यंत्रणांनी परिस्थितीची चौकशी करावी, अशी मागणीही केली आहे.

दरम्यान, पेट्रोल पंप चालकांकडूनही इंधनाचा पुरवठा नियमित नसल्याचे सांगितले जात आहे. पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहकांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. शहरातील काही पंपांवर इंधन संपल्याचे फलक लावण्यात आल्याने नागरिकांची अधिकच गैरसोय होत आहे.


Protected Content

Play sound