Home राजकीय नवीन सहकार धोरणात शेतकरी, महिला आणि युवकांना प्राधान्य द्या – नरेंद्र नारखेडे 

नवीन सहकार धोरणात शेतकरी, महिला आणि युवकांना प्राधान्य द्या – नरेंद्र नारखेडे 


सावदा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित नवीन सहकार धोरणामध्ये शेतकरी, महिला आणि युवकांसाठी स्वतंत्र आणि प्रभावी तरतुदी करण्यात याव्यात, अशी ठाम भूमिका सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी जळगाव येथे आयोजित सहकार परिषदेत मांडली. शेतमाल विक्रीसाठी स्वतंत्र धोरण, महिलांसाठी स्वतंत्र सहकारी संस्था तसेच युवक कल्याणासाठी नव्या सहकारी संस्थांची उभारणी यांचा नव्या धोरणात समावेश व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच अडचणीत आलेले आणि बंद पडलेले सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठीही विशेष धोरणात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सहकार भारती जळगाव जिल्हा आणि बळवन्त सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या सहकार परिषदेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपनिबंधक गौतम बल साने होते. परिषदेला जिल्हाभरातील सहकारी संस्थांचे सुमारे ३०० पदाधिकारी उपस्थित होते. नवीन सहकार धोरणाच्या विविध पैलूंवर या परिषदेत सखोल चर्चा करण्यात आली.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक तथा नवीन सहकार धोरण समितीचे सदस्य सतीश मराठे यांनी ग्रामीण भागात गुंतवणूक वाढविण्यासाठी स्थिर निधी व्यवस्था आणि ठेव संरक्षण यंत्रणा मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी युवक आणि महिलांचा सहकार क्षेत्रातील सहभाग वाढविणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतमाल साठवणुकीसाठी आधुनिक गोदाम उभारणी, पारदर्शक व्यवहार आणि भ्रष्टाचारमुक्त सहकार व्यवस्था उभारण्यासाठी धोरणात्मक बदल करण्यावर त्यांनी भर दिला.

सहकार धोरण समिती सदस्य तथा सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगाडे यांनीही नव्या सहकार धोरणाचा सविस्तर आढावा मांडत ग्रामीण भागातील सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी विविध उपाययोजनांची गरज व्यक्त केली. सहकार क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आणि तरुणांना सहकार व्यवस्थेशी जोडणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या परिषदेत संजय पवार, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत साळूखे तसेच बँक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रहास भाई गुजराती यांनी मनोगत व्यक्त करताना सहकार क्षेत्रातील विविध समस्या, आव्हाने आणि नव्या सूचना मांडल्या. परिषदेला बळवन्त सहकारी पतसंस्थेने आपल्या रौप्यमहोत्सवानिमित्त प्रायोजकत्व स्वीकारले होते. संस्थेच्या कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी यावेळी केला.

कार्यक्रमात जळगाव जनता बँकेचे चेअरमन सतीश मदाने, राष्ट्रीय संघटन मंत्री दिलीप पाटील, रेवती शेंदूरणीकर, शरद जाधव, संजय बिर्ला, बनसिलाल अंदोरे, उदय पेंडसे, शरद महाजन आणि प्रा. अनिल राव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

परिषदेदरम्यान नवीन सहकार धोरणाबाबत उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध सूचना मांडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र नारखेडे यांनी केले, तर सूत्रसंचालन मनीषा खडके आणि दिलीप माळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयदीप शहा, प्रमोद नगरकर, अनिता वाणी, प्रवीण नाना पाटील, आशुतोष अडावडकर, प्रवीण गडे, धनंजय फिरके तसेच बळवन्त पतसंस्थेचे संचालक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound