जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशसेवेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने विशेष पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या “सैनिक, माजी सैनिक व परिवार दिवस” कार्यक्रमात जिल्ह्यातील वीरनारी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक तसेच सेवारत सैनिकांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रोहन घुगे उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून विविध समस्या व प्रलंबित प्रकरणांबाबत एकूण २५ अर्ज प्रशासनाकडे सादर करण्यात आले. या अर्जांवर तातडीने कार्यवाही करून संबंधित प्रश्न निकाली काढण्याचे स्पष्ट आणि कडक निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संबंधित विभागांना दिले. प्रशासनाने सैनिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांचे निराकरण प्राधान्याने करण्याचा निर्धार व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात बोलताना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी देशाच्या सीमांवर कठीण परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या सैनिकांच्या योगदानाचे कौतुक केले. “सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी समजून घेणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यांच्या समस्या रेंगाळत ठेवू नयेत, तर त्या तातडीने आणि संवेदनशीलतेने सोडविण्यात याव्यात,” असे ते म्हणाले. सैनिकांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हितासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हरकर यांनीही प्रलंबित प्रकरणांवर मार्गदर्शन केले. प्राप्त झालेल्या अर्जांवर तात्काळ शेरे मारून ते संबंधित प्रशासकीय विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे उपस्थित सैनिक आणि कुटुंबीयांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान माजी सैनिक ईश्वर मोरे यांनी जळगाव जिल्ह्यात माजी सैनिकांसाठी स्वतंत्र ‘सैनिक कॉलनी’ उभारण्याची मागणी प्रशासनासमोर मांडली. जिल्ह्यातील माजी सैनिकांना सन्मानाने आणि सुरक्षित वातावरणात राहण्यासाठी ही गरज अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी विषय सकारात्मकपणे विचारात घेण्याचे आश्वासन दिले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ॲड. भारती कुमावत यांनी उपस्थित वीरनारी, वीरमाता, वीरपिता तसेच सैनिक कुटुंबीयांना मोफत न्यायालयीन सल्ला व कायदेशीर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हरकर, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जितेंद्र कुवर, तहसीलदार डॉ. उमा ढिकले, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख काशिनाथ मोरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (प्रभारी) संजय रामराव गायकवाड, तसेच ॲड. संदीप पाटील आणि ॲड. रूपाली कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविकाने केली. सूत्रसंचालन कल्याण संघटक विश्वनाथ उगले यांनी केले, तर आभार प्रदर्शनही संजय रामराव गायकवाड यांनी केले. जिल्ह्यातील मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या माजी व सेवारत सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांमुळे कार्यक्रमाला उत्साही वातावरण लाभले. सैनिकांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलता यामुळे उपस्थितांमध्ये समाधानाची भावना व्यक्त करण्यात आली.



