भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेविरुद्ध यशस्वी कारवाई करण्यात आली असून तिच्याविरुद्ध गुन्हा क्र २६५/२६ अन्वये इमिग्रेशन आणि परदेशी कायदा, २०२५ अंतर्गत कलम २१, २२ व २३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीकडेच जळगाव येथे एक बांगलादेशी महिला आढळून आल्यानंतर आता भुसावळला देखील असाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
आरोपी महिलेचे मूळ नाव फरीदा बेगम मोहम्मद खान (वय ४२ वर्षे), रा. भीमकाठी, उपजिल्हा नाझीरपूर, जिल्हा पीरोजपुर, बांगलादेश असे असल्याचे निष्पन्न झाले. ती भारतात आल्यानंतर “जस्मिन बी मोहम्मद खान” या नावाने दीनदयाल नगर, भुसावळ येथे वास्तव्यास होती. प्राथमिक चौकशीमध्ये आरोपी महिलेने सन २००९ मध्ये एका दलालास ५,००० रुपये देऊन बोटीच्या सहाय्याने नदीमार्गे बांगलादेशातून पश्चिम बंगाल येथे बेकायदेशीर प्रवेश केल्याची कबुली दिली. त्यानंतर ती रेल्वेने भुसावळ येथे आली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल जप्त केला. सदर मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणात IMO व WhatsApp ॲप्सवरून बांगलादेशी कंट्री कोड (+880) असलेल्या क्रमांकांशी सातत्याने संपर्क, चॅटिंग व व्हिडिओ कॉल्स झाल्याचे पुरावे प्राप्त झाले. तसेच मोबाईलमध्ये आरोपीच्या जन्मदाखल्याची प्रत देखील आढळून आली.
पुढील चौकशीत आरोपीने तिच्या मृत बहिणीच्या नावावरील लाईट बिल व इतर कागदपत्रांचा वापर करून स्वतःचे रेशन कार्ड, Aadhaar कार्ड, मतदान ओळखपत्र, PAN कार्ड, बँक पासबुक तसेच भारतीय पासपोर्ट तयार करून घेतल्याचे निष्पन्न झाले. या बनावट भारतीय पासपोर्टच्या आधारे आरोपी महिला मे २०२३ मध्ये बांगलादेशात जाऊन पुन्हा भारतात परत आल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. सदर प्रकरणात आरोपीस बनावट कागदपत्रे तयार करून देणारे संबंधित व्यक्ती, एजंट व दलाल यांचा शोध सुरू असून प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.



