जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्तनातील गाठीच्या गंभीर त्रासाने गेल्या एक वर्षापासून त्रस्त असलेल्या ५५ वर्षीय महिलेवर जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अचूक निदान प्रक्रिया आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वयातून ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून संबंधित महिलेला नवजीवन मिळाले आहे.
बर्हाणपूर येथील रशिदा (वय ५५) या महिलेला गेल्या वर्षभरापासून डाव्या स्तनात गाठ जाणवत होती. सुरुवातीला किरकोळ वेदना आणि सूज असल्यामुळे त्यांनी या त्रासाकडे दुर्लक्ष केले. मात्र कालांतराने गाठीचा आकार वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी उपचारासाठी जळगावातील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने रुग्णाची सविस्तर तपासणी केली.

या उपचार प्रक्रियेत डॉ. वैभव फरके, डॉ. पारितोष ठाकूर, डॉ. अपूर्वा गवई, डॉ. शुभम फावडे आणि डॉ. प्रज्योत कदम यांचा समावेश होता. रुग्णाच्या आजाराचे अचूक निदान करण्यासाठी विविध रक्ततपासण्या, सोनोग्राफी तसेच एफएनएसी या महत्त्वाच्या तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांच्या अहवालांनुसार स्तनातील गाठ गंभीर स्वरूपाची असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर डॉक्टरांच्या टीमने ‘मोडीफाइड रॅडीकल मॅस्टेक्टोमी’ या पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अनुभवी डॉक्टरांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने ही शस्त्रक्रिया पार पाडली. ऑपरेशनदरम्यान स्तनातील गाठ तसेच आवश्यक ऊतक सुरक्षितपणे काढून टाकण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
याबाबत माहिती देताना डॉ. शुभम फावडे यांनी सांगितले की, “स्तनातील गाठीकडे महिलांनी कधीही दुर्लक्ष करू नये. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाले तर उपचार अधिक प्रभावी ठरतात. या रुग्णामध्ये विविध तपासण्यांद्वारे आजाराचे अचूक निदान करून ‘मोडीफाइड रॅडीकल मॅस्टेक्टोमी’ पद्धतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.”
महिलांमध्ये स्तनाच्या आजारांबाबत जागरूकता वाढण्याची गरज असून कोणतीही गाठ, वेदना किंवा सूज आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी आवाहन केले आहे. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे पुन्हा एकदा रुग्णालयातील वैद्यकीय सेवांची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे.



