जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर आणि परिसरात वाईन शॉप तसेच दारू दुकानांच्या समोरील मोकळ्या जागेत, रस्त्यावर आणि परिसरात बेकायदेशीरपणे उघड्यावर दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक, महिला, लहान मुले आणि पादचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर, जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील वाईन शॉप आणि दारू दुकान चालकांना कायदेशीर नोटीस बजावत कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
या नोटीसमध्ये पोलीस प्रशासनाने दुकान चालकांना या तीन महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत:

सुविधा पुरवण्यास पूर्ण बंदी: वाईन शॉपच्या बाजूला किंवा परिसरात कोणत्याही व्यक्तीला मद्यप्राशन करण्यासाठी जागा, खुर्च्या, पाण्याचे ग्लास, खाद्यपदार्थ (चखणा) किंवा इतर कोणतीही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सुविधा दुकान चालक किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून पुरवता येणार नाही.
परिसरावर नियंत्रण: दुकानातून मद्य खरेदी करून कोणीही व्यक्ती बाहेर मोकळ्या जागेत अथवा रस्त्यावर दारू पिणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी दुकानदाराची असेल. याबाबत दुकानाच्या दर्शनी भागात फलक लावणे बंधनकारक आहे.
बळजबरीने हटवणे: दुकानाबाहेर कोणी मद्यप्राशन करताना आढळल्यास त्याला तात्काळ तिथून हटवण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असेल. गरज पडल्यास यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेता येईल.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले आहे की, या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित वाईन शॉपचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची शिफारस राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केली जाईल. तसेच नियम मोडणारे दुकानदार आणि मद्यपींवर कठोर कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्यात येईल. या मोहिमेमुळे उघड्यावर दारू पिणाऱ्यांना आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या दुकानदारांना मोठा चाप बसणार आहे.



