जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नाभिक बहुजन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक उत्कर्षासाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय जिवा सेना या सामाजिक संघटनेचा 26 वा वर्धापन दिन संभाजीनगर येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात संघटनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून खानदेशातील अनेक पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. देविदास फुलपगारे यांची राष्ट्रीय संपर्कप्रमुखपदी तर सचिन सैंदाणे यांची अखिल भारतीय युवा सेना विद्यार्थी आघाडीच्या प्रथमच प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
संभाजीनगर येथील संत सेना महाराज भवन, सिडको येथे आयोजित या कार्यक्रमाला विविध राज्यांतील पदाधिकारी, समाजबांधव आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पिंपळगावकर होते. उद्घाटक म्हणून डॉ. मनोज वाघ उपस्थित होते, तर प्रा. दत्ताजी कुंचलवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ॲड. गोविंद दळवी, प्रा. राजकुमार गाजरे, पांडुरंग शेळके, माजी प्रदेशाध्यक्ष दिनेश महाले, महाराष्ट्र संघटक सुधीर महाले, साहेबराव शेळके आणि सुरेश बोर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. श्री संत सेना महाराज, भन्ते उपाली, छत्रपती शिवाजी महाराज, शिवरक्षक जिवाजी महाले, शिवाजी काशीद, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, वीरभाई कोतवाल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. समाजप्रबोधन आणि सामाजिक एकतेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
या वर्धापन दिन कार्यक्रमात संघटनेच्या नव्या कार्यकारिणीबाबत चर्चा करण्यात आली तसेच विविध पदांसाठी मुलाखतीही घेण्यात आल्या. त्यानंतर नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना जबाबदाऱ्या प्रदान करण्यात आल्या. संघटनेचे कार्य अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्यासाठी नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला.
खानदेशातील माजी प्रदेशाध्यक्ष दिनेश महाले यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच देविदास फुलपगारे यांच्यावर राष्ट्रीय संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून सुधीर महाले यांची महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. युवा नेतृत्वाला संधी देत सचिन सैंदाणे यांची अखिल भारतीय युवा सेना विद्यार्थी आघाडीच्या प्रथम प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीमुळे खानदेशातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार यासह गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे वाढवण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. समाजातील युवकांना संघटनेशी जोडून सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक चळवळी अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.
या निवडीबद्दल उत्तर महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्यप्रदेशातील नाभिक समाजबांधवांकडून नव्या पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या तरुण नेतृत्वाला मिळालेली ही संधी भविष्यात संघटनेच्या विस्तारासाठी महत्त्वाची ठरणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय जिवा सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या पदनियुक्त्यांमुळे संघटनेला नवचैतन्य मिळाले असून नाभिक समाजाच्या प्रश्नांसाठी अधिक व्यापक स्तरावर लढा उभारला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



