जामनेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावातील ११ वर्षीय चिमुरडीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित अरोपीला अटक करण्यात आली आहे.
जामनेर तालुक्यातील एका गावात ११ वर्षीय चिमुकली ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ही मुलगी अनन्या ही १२ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरात एकटीच होती. याचाच गैरफायदा घेऊन संशयित आरोपी अमोल बाबूराव महाजन हा पाणी पिण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने फिर्यादीच्या घरात घुसला. पाणी न पिता त्याने घरात एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अंगावर हात फिरवून, तिला जवळ ओढून तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने स्वतःला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिला सोडले नाही. अखेर घाबरलेल्या चिमुरडीने प्रसंगावधान राखून जोरात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मुलीचा आवाज ऐकून कोणीतरी येईल या भीतीने नराधम आरोपी तिथून तात्काळ पळून गेला.

या धक्कादायक घटनेनंतर पीडितेच्या आईने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद नोंदवली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच संशयित आरोपी अमोल महाजन याला पोलिसांनी अटक केली आहे.



