यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून भाजपा गटनेत्या नंदा महाजन यांनी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलेले आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. हे आरोप केवळ राजकीय सूडबुद्धीतून प्रेरित असून जनतेचे लक्ष शहरातील मूलभूत प्रश्नांवरून हटविण्यासाठी रचलेले षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नंदा महाजन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या विरोधात करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन आहेत. यावलची जनता सत्य जाणून असून खोट्या आरोपांच्या माध्यमातून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला. आपली आणि आपल्या कुटुंबाची सामाजिक तसेच राजकीय कारकीर्द स्वच्छ आणि पारदर्शक राहिल्याचा दावा त्यांनी केला.

त्यांनी पुढे सांगितले की, विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना कायदेशीर आणि राजकीय पातळीवर ठोस उत्तर दिले जाईल. गरज भासल्यास अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचाही इशारा त्यांनी दिला. कायद्यावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगताना जनतेच्या विश्वासाशी खेळ करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
नंदा महाजन यांनी आपल्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख करत आपण एका सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या महिला असल्याचे सांगितले. यावलच्या जनतेने भरघोस मतांनी निवडून देत भारतीय जनता पक्षाच्या नगरपरिषद गटनेतेपदाची जबाबदारी दिली असून त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जनतेच्या हक्कांसाठी कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर आवाज उठवला की काही लोकांना तो त्रासदायक वाटतो, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणे हा गुन्हा नसून लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य असल्याचे सांगत भविष्यातही जनतेच्या प्रश्नांसाठी होणाऱ्या प्रत्येक मोर्चात स्वतः सहभागी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
हा मोर्चा शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने प्रशासनापर्यंत जनतेचा आवाज पोहोचवण्यासाठी काढण्यात आला होता. मात्र नागरिकांच्या प्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी काही जण वैयक्तिक आरोपांचे राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली. यावलची जनता सर्व परिस्थिती बारकाईने पाहत असून योग्य वेळी तीच खरे उत्तर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



