जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेत जळगाव शहरात नव्या नेतृत्वाला संधी देण्यात आली असून प्रितम रवींद्र शिंदे यांची युवासेना जळगाव महानगर युवाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच शिवसेना आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी प्रितम शिंदे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रितम शिंदे हे गेल्या काही वर्षांपासून शिवसेना आणि युवासेनेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे कार्यरत असून युवकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क असल्याचे मानले जाते. शहरातील सामाजिक, राजकीय आणि युवकांशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडल्याने पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवासेनेची ताकद वाढविण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या नियुक्तीचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा उपनेते संजय सावंत, गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, विस्तारक प्रवीण चव्हाण तसेच युवासेना जिल्हा युवाधिकारी पियुष गांधी यांनी स्वागत केले आहे. पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांनी प्रितम शिंदे यांना शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव महानगरात युवासेना अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.



