जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि बौद्धिक वारशाचे जतन करण्यासाठी केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयामार्फत “ज्ञानभारतम्” (Gyan Bharatam) प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेद्वारे देशभरातील दुर्मिळ व ऐतिहासिक हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांचे दस्तऐवजीकरण आणि डिजिटल जतन करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधकांसाठी उपलब्ध करून देण्याची योजना आहे.

महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे यांची क्लस्टर केंद्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आनंद आश्रम संस्थान आणि भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे यांची स्वतंत्र केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे.
राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य नोडल अधिकारी म्हणून सुजितकुमार उगले कार्य पाहणार आहेत. सहनोडल अधिकारी म्हणून श्रीमती अंजली ढमाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या मोहिमेसाठी “Gyan Bharatam” हे विशेष मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी आणि दस्तऐवजीकरण केले जाणार आहे. जिल्हास्तरावर समित्या आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या उपक्रमात शैक्षणिक संस्था, संशोधक, संस्कृत पाठशाळा, धार्मिक संस्था, पारंपरिक पंडित, विद्यार्थी, NCC-NSS स्वयंसेवक आणि वारसा संवर्धन संस्थांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. नागरिकांनी आपल्या जवळील हस्तलिखितांची माहिती “ज्ञानभारतम्” मोबाईल अॅपवर अपलोड करून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन आणि भावी पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.



