जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प.पू. संत श्री झिपरू अण्णा महाराज यांच्या ७७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेला पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला. रामेश्वर कॉलनी येथून नशिराबादमधील झिपरू अण्णा नगरकडे निघालेल्या या पालखी सोहळ्यात वारकरी, महिला मंडळे आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भजन-कीर्तनाच्या स्वरांत संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
सोमवारी सकाळी ७ वाजता रामेश्वर कॉलनीतील श्री गजानन महाराज मंदिरात पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद पिपळे व मंगला पिपळे उपस्थित होते. पालखी पूजनाचा मान सुधीर डहाके आणि जयश्री डहाके या दांपत्याला मिळाला. श्री गणपती, श्री गजानन महाराज, श्री हनुमंत राय, श्री भगवान जिव्हेश्वर आणि संत श्री झिपरू अण्णा महाराज यांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर श्री गजानन महाराज बावन्नीचे पठण करण्यात आले.

मंदिराचे संस्थापक अध्यक्ष तथा पुजारी राजा जोशी यांनी मंत्रोच्चार करून पालखी पूजन विधी पार पाडला. यानंतर मोठ्या जल्लोषात पालखी नशिराबादकडे रवाना झाली. पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री गजानन महाराज मंदिराचे अध्यक्ष किशोर कोलते, सूर्यकांत नाईक, नितीन राणे, मनोहर भालेराव तसेच श्री जिव्हेश्वर नवयुवक मंडळाचे कार्यकर्ते सुधीर खंडारे, किशोर खंडारे, सोपान आदमने, विकास डहाके, चेतन डहाके, शेखर काळे, अरुण बाकडे, आयुष, पियुष केकान आदींनी परिश्रम घेतले.
महिला मंडळातील जयश्री डहाके, कावेरी डहाके, पुष्पा आदमने, दिपाली खंडारे, नेहा खंडारे, राधिका केकान, मोक्षदा, प्रिशा आणि जिविका यांच्यासह अनेक महिलांनी टाळ-मृदंगाच्या तालावर भजन गायन करत पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. वारकरी भाविकांनी “भेटी लागे जीवा” या भावनेने एकमेकांना भेटत भक्तिमय वातावरण निर्माण केले.
या पुण्यतिथी आणि पालखी सोहळ्यासाठी बाहेरगावाहून अनेक भाविक विशेष उपस्थित राहिले होते. मंगला लाडके, ज्योती जगताप, लता धमके, पंडित साळी सहपरिवार, महेश भोगरे, संगिता भोगरे, प्रियंका साळी, नम्रता जगताप, दिपकशेठ जगताप, रमेश सातपुते, अशोक भुतकर, प्रशांत जगताप, मुकेश भांबळे, दत्ता भोगरे, पूर्वेश खंडारे यांच्यासह अनेक समाजबांधवांनी समाधीस्थळी दर्शन घेतले.



