Home Cities जळगाव जळगावात ‘कूल रूफ सोल्युशन’चे काम सुरू ; पत्र्याच्या घरांतील तापमानात तब्बल १०...

जळगावात ‘कूल रूफ सोल्युशन’चे काम सुरू ; पत्र्याच्या घरांतील तापमानात तब्बल १० अंशांनी घट


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी जळगाव महानगरपालिकेच्या पुढाकारातून ‘कूल रूफ सोल्युशन’ उपक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सुप्रीम कॉलनी परिसरात या उपक्रमाचा शुभारंभ महापौर दीपमाला काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. विशेष सोलर रिफ्लेक्टिव्ह पेंटच्या वापरामुळे घरांतील तापमानात तब्बल १० अंश सेल्सिअसपर्यंत घट झाल्याचे निरीक्षण समोर आले आहे.

“महाराष्ट्रातील उष्णता व पाणी ताण कमी करण्यासाठी निसर्ग आधारित उपाय” या प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ऑल इंडिया डिझास्टर मेटिगेशन इन्स्टिट्यूट (AIDMI), अहमदाबाद, प्रॅक्टिकल ॲक्शन, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था आणि जळगाव महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारला जात आहे. शहरातील उष्णतेचा वाढता प्रभाव लक्षात घेता पत्र्याच्या घरांवर विशेष सोलर रिफ्लेक्टिव्ह रंगाचा डबल कोट देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मंगळवारी सुप्रीम कॉलनी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते प्रकल्पाच्या बॅनरचे अनावरण करून उपक्रमाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. यावेळी उपआयुक्त पंकज गोसावी, नगरसेविका अनिता भापसे, पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील, महिला हाउसिंग ट्रस्टच्या मनिषा नाफडे यांच्यासह विविध अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत घरांच्या पत्र्यांवर सोलर रिफ्लेक्टिव्ह पेंटचा डबल कोट दिला जात आहे. या विशेष रंगामुळे सूर्यकिरणांचे परावर्तन होते आणि घरातील उष्णता कमी राहण्यास मदत होते. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी रंग दिलेल्या आणि न दिलेल्या घरांचे तापमान प्रत्यक्ष तपासले. यावेळी रंग केलेल्या घरांमध्ये तुलनेने अधिक थंड वातावरण असल्याचे स्पष्टपणे जाणवले. दोन्ही घरांच्या तापमानात सुमारे १० अंश सेल्सिअस इतका फरक आढळून आला.

महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः चार ते पाच घरांची पाहणी करून या प्रकल्पाच्या परिणामकारकतेचे कौतुक केले. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी असे उपक्रम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील उष्णतेच्या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

या प्रकल्पाचा विस्तार शहरातील विविध भागांमध्ये करण्यात येत आहे. समतानगर, तांबापुरा, सुप्रीम कॉलनी आणि पिंप्राळा हुडको परिसरातील प्रत्येकी १०० पत्र्यांची तसेच ३०० स्क्वेअर फुटांखालील काँक्रीटची घरे निवडण्यात आली आहेत. अशा एकूण ४०० घरांवर सोलर रिफ्लेक्टिव्ह पेंट देण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी ‘कूल रूफ सोल्युशन’ हा उपक्रम मोठा दिलासा ठरत असून, पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक उपाययोजनेमुळे शहरातील सामान्य नागरिकांना थेट फायदा होणार आहे. जळगाव महानगरपालिकेच्या या अभिनव उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.


Protected Content

Play sound