मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहर पुन्हा एकदा अवैध रेती, मुरूम आणि माती वाहतुकीच्या दहशतीने हादरले आहे. शहरातील बऱ्हाणपूर रोडवरील स्मशानभूमीजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात भरधाव डंपरने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास रेती, मुरूम व मातीची अवैध वाहतूक करणारा डंपर भरधाव वेगाने जात होता. याच वेळी दुचाकीवरून जात असलेल्या दोघांना डंपरने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक वाहनासह फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

मृत झालेले दोघेही मध्यप्रदेशातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ते मुक्ताईनगर परिसरात शेतीच्या कामासाठी सालदार म्हणून आले होते, अशी माहिती मिळत आहे. मात्र मृतांची अधिकृत ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
या अपघातानंतर शहरात सुरू असलेल्या अवैध वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी शहरातून मोठ्या प्रमाणात अवैध डंपर वाहतूक सुरू असते. भरधाव वेग, नियमांचे उल्लंघन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा तक्रारी आणि सूचना देऊनही संबंधित यंत्रणा ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत अवैध वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. “निष्पाप लोकांचे जीव जात असताना प्रशासन नेमके काय करत आहे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अवैध रेती व मुरूम वाहतुकीमुळे रस्तेही धोकादायक बनले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.



