जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरालगत असलेल्या विनायक नगर, खेडी परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तुषार हरिश्चंद्र नवले (वय-२४) हा तरुण जखमी झाला असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार नवले हे १० मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोर विनायक नगर भागात उभा होता. यावेळी आरोपी चेतन सोनवणे याने कोणतेही ठोस कारण नसताना तुषार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ का करतो? असा जाब विचारला असता, वाद अधिकच विकोपाला गेला. रागाच्या भरात आरोपीने तुषार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी तुषार यांची आई सिंधूबाई नवले या भांडण सोडवण्यासाठी आणि आरोपीला समजवण्यासाठी मध्ये पडल्या. मात्र, आरोपीने त्यांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपी चेतन याने आपल्या कमरेला लावलेले धारदार चाकू सारखे शस्त्र काढून तुषार यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर वार केला. या हल्ल्यात तुषार रक्तबंबाळ झाले.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. जखमी तुषार यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी चेतन सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ किशोर निकुंभ हे करीत आहे.



