भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषदेतील राजकीय घडामोडींना वेग आला असून प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भाजपने वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकार पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा नगरसेवक संतोष चौधरी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपच्या वतीने नगरसेविका प्राची पाटील यांनी “लेवा पाटीदार समाजाच्या नगरसेविकांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असा आरोप करत विरोधकांना खुले आव्हान दिले.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी कायदेशीर तरतुदींचा दाखला देत माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या अपात्रतेबाबत भूमिका स्पष्ट केली. अनुसूचित जाती आरक्षणातून निवडून आलेल्या गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर शासनाने कायद्यानुसार कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ आणि जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम २००० अंतर्गत ४ मे २०२६ रोजी शासनाने आदेश जारी करून त्यांची नगरसेवक आणि नगराध्यक्षा म्हणून झालेली निवड रद्द केल्याचे लोणारी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गायत्री भंगाळे यांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. नगराध्यक्ष पद रिक्त झाल्यानंतर महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमाच्या कलम ५७ नुसार उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पदभार सोपवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेत बोलताना युवराज लोणारी यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींनी गायत्री भंगाळे यांच्या निवासस्थानी नोटीस बजावण्याचा प्रयत्न केला असता ती स्वीकारण्यास नकार देण्यात आला. तथापि, १४ जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत फौजदारी कारवाईस तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपरिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेबाबतही भाजपने भूमिका स्पष्ट केली. शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ३ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ७५ विषयांवरील कामे अद्याप सुरू का झाली नाहीत, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे लोणारी यांनी म्हटले. यासोबतच २३ लाख रुपयांच्या पाइपलाइन लिकेज बिलाची चौकशी, डिझेल खर्चाचा तपास आणि ३० लाख रुपयांच्या व्यवहाराची तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली.
नगरसेविका प्राची पाटील यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांना थेट आव्हान देताना, “सात नगरसेविका जाऊ द्या, एक नगरसेविका अपात्र करून दाखवा,” असे जाहीर वक्तव्य केले. त्यांनी लेवा पाटीदार समाजाच्या नगरसेविकांना राजकीय हेतूने लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला.
यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविका पुष्पा कैलास चौधरी यांनी मागील सर्वसाधारण सभेत धक्काबुक्की केल्याचा आरोप करत त्याविरोधात लवकरच तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही भाजपकडून सांगण्यात आले. तसेच अकिल पिंजारी यांच्यासोबत शहर विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय झाला होता, मात्र संतोष चौधरी यांनी त्याला विरोध केल्याचा आरोपही लोणारी यांनी केला.
रजनी सावकारे यांच्या मूळ गावाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांनाही भाजपने उत्तर दिले. त्यांचे मूळ गाव फैजपूर असल्याचे आणि त्यांच्या वडिलांचे तसेच आजोबांचे घर तेथे असल्याचे सांगण्यात आले. लग्नानंतर महिलांच्या कागदपत्रांमध्ये पतीचे नाव वापरणे ही सामान्य प्रक्रिया असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
फालक, वारके आणि भारंबे आडनावाच्या व्यक्तींच्या जमिनींवर आरक्षण टाकून त्यांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोपही भाजपकडून करण्यात आला. या प्रकरणांची नागरिकांनी माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.



