जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्ते अपघातानंतरचा पहिला एक तास हा ‘गोल्डन अवर’ मानला जातो. या काळात जखमीला योग्य प्रथमोपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. याच उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दल आणि डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अपघातग्रस्तांना त्वरित मदत’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या डॉ. केतकी पाटील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
महत्त्वाच्या मान्यवरांची उपस्थिती :
या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते झाले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक नंदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास बावचोळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, रुग्णालय व्यवस्थापक आशिष भिरूड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक उपस्थित होते.

प्रथमोपचाराचे महत्त्व आणि प्रात्यक्षिके :
मार्गदर्शन सत्रात डॉ. सतीश पी. आणि डॉ. मोहीत पाटील यांनी अपघातग्रस्तांना द्यावयाच्या प्राथमिक उपचारांची माहिती दिली. रुग्णाचा श्वास सुरू ठेवणे, रक्तस्त्राव थांबवणे आणि रुग्णवाहिका येईपर्यंत जखमीला सुरक्षितरीत्या हाताळणे याबाबत पोस्टर आणि प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. अपघाताच्या ठिकाणी केवळ गर्दी न करता शास्त्रीय पद्धतीने मदत कशी करावी, यावर तज्ज्ञांनी भर दिला.
प्रशासनाचे आवाहन आणि ‘मृत्यूंजय दूत’ :
अपर पोलीस अधीक्षक नंदीप गावित यांनी सांगितले की, “महाराष्ट्रात १०८ क्रमांकाची मोफत रुग्णवाहिका सेवा २४ तास उपलब्ध आहे. तसेच महामार्गावरील मदतीसाठी १०३३ हा क्रमांक डायल करावा.” शासनाच्या ‘मृत्यूंजय दूत’ योजनेची माहिती देताना सपोनि विशाल पाटील यांनी स्पष्ट केले की, मदतीसाठी पुढे येणाऱ्या नागरिकांना आता कायदेशीर संरक्षण आहे, त्यामुळे न घाबरता मदतीसाठी पुढे यावे. पीएम राहत योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
मोफत रुग्णवाहिका सेवेची घोषणा :
याप्रसंगी डॉ. वैभव पाटील यांनी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी महाविद्यालयातर्फे अपघातग्रस्त रुग्णांसाठी ‘मोफत रुग्णवाहिका’ सेवा सुरू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘फर्स्ट एड बॉक्स’चे वितरण करण्यात आले. डॉ. संस्कृती भिरूड, डॉ. ऋचा गौर व डॉ. मोहीत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



