Home क्राईम जळगावात एम. जे. कॉलेज परिसरातील तीन कॅफेंवर पोलिसांची धडक कारवाई !

जळगावात एम. जे. कॉलेज परिसरातील तीन कॅफेंवर पोलिसांची धडक कारवाई !


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असलेल्या एम. जे. कॉलेज परिसरातील तीन कॅफेंवर पोलिसांनी अचानक धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, इतर कॅफे चालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेले ‘दामिनी पथक’ देखील सहभागी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. एम. जे. कॉलेज परिसरातील काही कॅफेमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तसेच काही गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी विशेष पथकाची स्थापना केली होती.

या पथकामध्ये पोलीस कर्मचारी अवेश शेख, प्रणय पवार आणि अमोल ठाकूर यांचा समावेश होता. पोलिसांनी एकाच वेळी तीन कॅफेंवर धाड टाकून तपासणी केली. कॅफेंमधील खोल्या, बसण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा तसेच ग्राहकांची चौकशी करण्यात आली. काही ठिकाणी ‘कपल बॉक्स’ स्वरूपातील बंदिस्त व्यवस्था असल्याची माहितीही समोर आली आहे.

या कारवाईत ‘दामिनी पथक’ सहभागी असल्यामुळे महिला सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थिनींची मोठी वर्दळ असल्याने कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसांनी ही मोहीम हाती घेतल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी तीनही कॅफेंची कसून तपासणी केली असून संबंधितांकडून आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.


Protected Content

Play sound