जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मध्यवर्ती टॉवर चौक परिसरातील एका लॉजवर सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एचटीयू) संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अत्यंत शिताफीने डमी ग्राहक पाठवत सापळा रचला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लॉजमध्ये अनेक दिवसांपासून अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबी आणि एचटीयूच्या पथकाने रात्री उशिरा संयुक्त कारवाईची योजना आखली. पोलिसांनी प्रथम डमी ग्राहक संबंधित लॉजमध्ये पाठवला. तेथे पैशांची बोलणी झाल्यानंतर डमी ग्राहकाने पूर्वनियोजित इशारा दिला.

इशारा मिळताच बाहेर दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या पथकाने लॉजवर अचानक धाड टाकली. या कारवाईत लॉजमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय रंगेहाथ उघडकीस आला. पोलिसांनी लॉज व्यवस्थापकासह काही संशयित दलालांना ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून काही महिलांची सुटका करण्यात आली आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी लॉजमधून काही रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच इतर साहित्य जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांना संरक्षण व समुपदेशनासाठी संबंधित यंत्रणेकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू होती.
या प्रकरणी संबंधितांविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. शहरातील मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या या अवैध प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या या धडक कारवाईची शहरभर चर्चा सुरू आहे.



