Home Cities जामनेर जामनेरमध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर पाटील यांचा भव्य सेवानिवृत्ती सोहळा 

जामनेरमध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर पाटील यांचा भव्य सेवानिवृत्ती सोहळा 


जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर येथील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार व गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात संपन्न झाला. पोलिस सेवेत तब्बल ३२ वर्षे प्रामाणिकपणे कार्यरत राहून जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणाऱ्या मनोहर पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलिस उपअधीक्षक प्रभाकर रायते उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सेवानिवृत्तीनंतरचा काळ कुटुंबासोबत आनंदाने व्यतीत करत समाजसेवेतही सक्रिय राहण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालत समाजातील दुःखात सहभागी होणे आणि जनतेची सेवा करणे हेच खरे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तथा छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांनी आपल्या भाषणात राजमाता जिजाऊंच्या संस्कारांमुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले, यावर सविस्तर भाष्य केले. स्वराज्याच्या विचारांमुळेच शिवरायांनंतरही महाराष्ट्राने औरंगजेबाविरोधातील संघर्ष कायम ठेवला, असे सांगत त्यांनी महिलांना भावी पिढीत स्वराज्यनिष्ठ विचार रुजविण्याचे आवाहन केले.

मनोहर पाटील यांचे कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले असून त्यांच्या कुटुंबाचेही विविध सामाजिक उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान राहिल्याचे मान्यवरांनी नमूद केले. त्यामुळेच या गौरव सोहळ्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.

यावेळी गरीब कुटुंबातील होतकरू युवक राहुल कुमावत यांनी पोलिस उपनिरीक्षक (PSI) पद मिळवल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठान आणि आझाद मित्र मंडळाच्या वतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या यशामुळे उपस्थित तरुणांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमादरम्यान राहुल चव्हाण यांनी आपल्या मनोगतात मनोहर पाटील यांच्या ३२ वर्षांच्या पोलिस सेवेला सलाम करत त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. “एखाद्या कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देणे म्हणजे त्या वातावरणाचाच एक भाग होणे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. “आजच्या कार्यक्रमात प्रत्येक क्षेत्रातील बाप माणूस उपस्थित आहे आणि मामा यांच्या कार्याची साक्ष हा जनसमुदाय देत आहे,” असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमास मुरलीधर कासार, जितेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, माजी नगरसेवक दीपक तायडे, नगरसेवक अतिश झाल्टे, अमोल चव्हाण, डॉ. बेंद्रे, प्रकाश पाटील, सुभाष पवार, जगदीश बैरागी, कमलेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन एकेश मनोहर पाटील यांनी मानले.


Protected Content

Play sound