जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केट परिसरातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मोहीम हाती घेतली असून शुक्रवारी विविध भागांमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान गल्लीबोळांमध्ये लपवून ठेवण्यात आलेल्या पेट्या, टेबल तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या जप्त करण्यात आल्या. कारवाईमुळे फुले मार्केट आणि सुभाष चौक परिसरात रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अतिक्रमण निर्मूलन मोहिमेअंतर्गत शुक्रवार, ८ मे रोजी शहर पोलीस स्टेशन गल्ली, वैभव गल्ली, बळीराम पेठ, जैन मंदिर परिसर तसेच फुले मार्केट परिसरात विशेष मोहीम राबविण्यात आली. या भागांमध्ये काही हॉकर्सनी गल्लीबोळांमध्ये लपवून ठेवलेल्या पेट्या आणि टेबलांवर महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई केली. कारवाईदरम्यान लोट गाड्या आणि तब्बल १५ टेबल जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

याशिवाय सुभाष चौक आणि दाणा बाजार परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आला. रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या तीन गाड्यांवरही कारवाई करत त्या जप्त करण्यात आल्या.
फुले मार्केट परिसरात वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या, गर्दी तसेच पादचाऱ्यांना होणारा त्रास याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. त्यानंतर महानगरपालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाकडून पुढील काही दिवसांतही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
ही संपूर्ण कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे कर्मचारी आणि पथकातील अधिकारी उपस्थित होते.



