Home राजकीय मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा; आंतरवाली सराटीत होणार मोठी घोषणा

मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा; आंतरवाली सराटीत होणार मोठी घोषणा


जालना-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 16 मे रोजी आंतरवाली सराटी येथे आयोजित बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा आणि तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारला कितीही मायेने सांगितले तरी ते मराठा समाजाच्या अश्रूंना न्याय देणार नाही, त्यामुळे आता कठोर आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले.

शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने आता एकजुटीने आणि कट्टर भूमिकेत आंदोलनात उतरले पाहिजे. “सरकारला विनंती करून काहीही साध्य होत नाही. दयामाया दाखवून न्याय मिळत नाही. आंदोलनच अंतिम मार्ग आहे,” असे ते म्हणाले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना व्याज परतावा मिळत नसल्यामुळे मराठा समाजातील अनेक तरुण उद्योजक अडचणीत सापडल्याचा आरोपही त्यांनी केला. “सरकारनेच अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यात वाद निर्माण करून दोघांनाही बदनाम करण्याचे काम केले आहे. मात्र यात मराठा समाज भरडला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

जरांगे पाटील यांनी सरकारवर मराठा समाजाच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी मुद्दाम रखडवून ठेवल्याचाही आरोप केला. हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया थांबली असून जून महिन्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “सातारा संस्थानचे गॅझेटिअर अद्याप का निघाले नाही? मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे का घेतले नाहीत?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना एमआयडीसीमध्ये नोकऱ्या देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, मात्र त्यासंदर्भातील शासन निर्णय अद्याप निघाला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अनेक कुटुंबांना आर्थिक मदतही मिळालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. “सरकार आमच्या मेलेल्या बांधवांचेही राजकारण करत आहे,” अशी टीका त्यांनी केली.

“या सगळ्या प्रश्नांवर आता एकदाच अंतिम लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात खूप मोठे आंदोलन उभे राहणार असून त्याची तारीख 16 मे रोजी आंतरवाली सराटीत जाहीर केली जाईल,” असे सांगत जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला.


Protected Content

Play sound