Home Cities जळगाव सुप्रीम कॉलनीतील रस्त्यांची दुरवस्था; सुविधा न दिल्यास मनसेचा जनआंदोलनाचा इशारा

सुप्रीम कॉलनीतील रस्त्यांची दुरवस्था; सुविधा न दिल्यास मनसेचा जनआंदोलनाचा इशारा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या सुप्रीम कॉलनी परिसरातील रस्त्यांची बिकट अवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, या प्रश्नाकडे तातडीने लक्ष न दिल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महानगरपालिकेला दिला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

सुप्रीम कॉलनी रिक्षा स्टॉप ते सागर अपार्टमेंट तसेच सागर अपार्टमेंट (गीतांजली केमिकल) ते कृष्णानगर मागील परिसर या प्रमुख मार्गांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. संबंधित रस्त्यांवर सात ते आठ वर्षांपूर्वी केवळ खडी टाकून कच्च्या स्वरूपात काम करण्यात आले होते. त्यानंतर ना डांबरीकरण झाले, ना कोणतीही मजबुतीकरण प्रक्रिया राबविण्यात आली. परिणामी या मार्गांवर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालक आणि पादचारी नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

पावसाळ्यात या परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण होते, तर उन्हाळ्यात उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला दररोज या समस्येचा सामना करावा लागत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांकडून नियमित कर आकारला जात असताना बदल्यात मूलभूत सुविधा न मिळणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

शहरात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या घोषणा केल्या जात असताना शहराच्या उपनगरांतील आणि औद्योगिक वसाहतीलगतच्या भागांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. विकास केवळ मध्यवर्ती भागापुरता मर्यादित न राहता शहराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सुप्रीम कॉलनी परिसरात औद्योगिक वसाहतीत काम करणारा नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास असून, दैनंदिन धकाधकीमुळे अनेकांना महानगरपालिकेकडे पाठपुरावा करणे शक्य होत नसल्याने हा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्याचे सांगण्यात आले.

नागरिकांच्या व्यथा लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. महानगरपालिकेने तातडीने सुप्रीम कॉलनी परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण, मजबुतीकरण आणि आवश्यक विकासकामे हाती घ्यावीत, तसेच नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आगामी काळात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा, महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भील, शाखाध्यक्ष युसूफ खाटीक, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, राजेश मराठे, बादशहा शहा यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.


Protected Content

Play sound