मुंबई-वृत्तसेवा । बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा Sunetra Pawar यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून पक्षातील हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांची नावे चर्चेत असताना ज्येष्ठ नेते व मंत्री Chhagan Bhujbal यांनी मात्र या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी सध्या राज्यात ज्येष्ठ मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. मंत्रिपदाची जबाबदारी असताना राज्यसभेवर जाण्यासाठी आग्रह धरणे योग्य ठरणार नाही. या संदर्भात पक्षात अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल, तो अंतिम असेल.”

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी पक्षातील अनेक इच्छुक नेत्यांनी रस दाखवल्याची चर्चा असून त्यामुळे अंतर्गत स्पर्धा वाढल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काळात पक्ष संघटनेतील इतर महत्त्वाच्या पदांवरही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यसभेच्या या रिक्त जागेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेससमोर मुंबई प्रदेशाध्यक्ष निवडीचे मोठे आव्हानही उभे ठाकले आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात Sameer Bhujbal यांनी मुंबई प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे राज्यसभा आणि मुंबई प्रदेशाध्यक्षपद या दोन्ही महत्त्वाच्या नियुक्त्या एकाच वेळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नियुक्त्यांमुळे पक्षातील गटबाजी, संघटनात्मक फेरबदल आणि आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आता तीन खासदार उरले आहेत. त्यामध्ये Praful Patel, Parth Pawar आणि Nitin Patil यांचा समावेश आहे. प्रफुल्ल पटेल यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत, नितीन पाटील यांची मुदत 2028 पर्यंत तर नुकतेच राज्यसभेवर निवडून गेलेले पार्थ पवार 2032 पर्यंत खासदार राहणार आहेत.
आता सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पक्ष नेतृत्व कोणत्या नेत्यावर विश्वास दाखवणार आणि संघटनात्मक पातळीवर कोणते बदल होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



