जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याला विद्यार्थ्यांचा आणि उद्योगसंस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना नोकरी व प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्याने हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आशादायी ठरला.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव तसेच लेवा भ्रातृमंडळ पिंपळे सौदागर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या मेळाव्यासाठी नोंदणी केली होती. कार्यक्रमाची सुरुवात नोंदणी व मार्गदर्शन सत्राने झाली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना करिअरविषयक दिशा देण्यात आली.

यानंतर विविध नामांकित उद्योगसंस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून उपलब्ध पदांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. अभियांत्रिकी, यंत्र, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, स्वयंचलन, माहिती तंत्रज्ञान, उत्पादन व व्यवस्थापन या क्षेत्रांतील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत लेखी परीक्षा, तांत्रिक मुलाखत आणि वैयक्तिक मुलाखत अशा विविध टप्प्यांचा समावेश होता.
या मेळाव्यात प्रोफासाईमा ग्लोबल सोल्यूशन्स एलएलपी, त्रिविम टेक्नो क्राफ्ट्स प्रा. लि., प्रोसर इंडस्ट्रीज (पुणे), प्रोटोवोक टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (मुंबई), छबी इलेक्ट्रिकल (जळगाव), स्पेशालिटी सिंटर्ड प्रॉडक्ट्स लि. (सातारा), मनराज ऑटोमोबाईल्स (जळगाव), इंगीअर्ज प्रा. लि. (सातारा), एनबीटी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (पुणे), किरण मशीन टूल्स (जळगाव), स्टार फॅब्रिकेटर्स (जळगाव), गोदावरी फाउंडेशन, युवा शक्ती फाउंडेशन तसेच क्वेस क्रॉप प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांचा सहभाग होता. काही उद्योगसंस्थांनी प्रशिक्षणासह नोकरीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभवासह करिअरची दिशा मिळाली.
या संपूर्ण प्रक्रियेनंतर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आणि त्यांना नोकरीच्या संधी देण्यात आल्या. या उपक्रमासाठी डॉ. विजयकुमार वानखेडे व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.
या यशस्वी आयोजनामागे महाविद्यालयाचा प्रशिक्षण व नियोजन विभाग, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले. विविध उद्योगसंस्थांची उपस्थिती आणि मोठ्या प्रमाणात झालेली निवड यामुळे हा रोजगार मेळावा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
या उपक्रमाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.



