चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मैत्रीचा गैर फायदा घेवून एका २४ वर्षीय तरुणीला ब्लॅकमेल करत तिची आर्थिक लूट आणि विनयभंग केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी तत्परता दाखवत संशयित आरोपी यश महेंद्र जैन याला अटक केली असून त्याच्याविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपी यश जैन याच्याशी जुनी ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेशी मैत्री प्रस्थापित केली. मात्र, ही मैत्री केवळ एक जाळे निघाले. आरोपीने व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर बोलत असताना पीडितेची संमती नसताना तिचे खासगी क्षण रेकॉर्ड केले. यानंतर आरोपीने आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली.

आरोपीने हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेकडे वारंवार शरीर सुखाची मागणी केली. नकार दिल्यावर त्याने तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाणही केली. बदनामीच्या भीतीने हतबल झालेल्या पीडितेकडून आरोपीने वेळोवेळी एकूण ८ लाख १२ हजार रुपये (फोन-पे आणि रोख स्वरूपात) उकळले. एवढेच नव्हे तर तिच्याकडून ९० ग्रॅम सोन्याची बिस्किटे आणि कॉइन्स देखील बळजबरीने हस्तगत केले. अखेर या छळाला कंटाळून तरुणीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी यश जैन याला अटक केली आहे.



