जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील व्यापारी दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या महात्मा फुले मार्केटची दुरवस्था दूर करण्यासाठी अखेर महापालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. मंगळवार, ५ मे रोजी महापौर दीपमाला काळे यांनी मार्केट परिसराची अचानक पाहणी करत अस्वच्छता, दुर्गंधी आणि अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न प्रत्यक्ष पाहिला आणि तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
पाहणीदरम्यान मार्केट परिसरात सर्वत्र पसरलेला कचरा, साचलेली घाण आणि अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास स्पष्टपणे समोर आला. ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याने महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या वेळी त्यांनी स्थानिक व्यापारी व नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

महापौरांनी केवळ पाहणीपुरते न थांबता प्रशासनाला तात्काळ कृतीचे आदेश दिले. मार्केट परिसरातील स्वच्छतेकडे होत असलेले दुर्लक्ष आणि वाढते अतिक्रमण यावर कठोर भूमिका घेत त्यांनी अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याच्या सूचना केल्या. “स्वच्छता आणि शिस्त हीच शहराच्या विकासाची ओळख आहे,” असे सांगत त्यांनी प्रशासनाला कडक शब्दांत इशारा दिला.
या पाहणीनंतर महापौर दीपमाला काळे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत उद्यापासून महात्मा फुले मार्केटमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच, वाहतुकीस अडथळा ठरणारे आणि ग्राहकांच्या हालचालीत अडथळा निर्माण करणारे सर्व अतिक्रमण पूर्णपणे हटवले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
महापौरांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मार्केट परिसराचा चेहरामोहरा बदलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. व्यापारी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, अतिक्रमणधारकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



