जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात अवैध रित्या गोवंश वाहतूक आणि कत्तल करणाऱ्यांविरुद्ध पोलीस दलाने आता आक्रमक पाऊल उचलले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली जिल्ह्याभरात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तस्करांचे कंबरडे मोडण्यात आले असून, मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष मोहिमेचा दणका :
३० एप्रिल ते २ मे दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात ‘महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम’ अंतर्गत ही धडक मोहीम राबवण्यात आली. या तीन दिवसांच्या कालावधीत धरणगाव, यावल, शनिपेठ, भडगाव, चाळीसगाव, रावेर, पाचोरा आणि एमआयडीसी यांसारख्या प्रमुख पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी धाडी टाकल्या. या कारवाईत एकूण २४ गुन्हे दाखल करण्यात आले असून २५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लाखोंचा मुद्देमाल जप्त :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत तब्बल ७८ जिवंत जनावरांची (गाय, बैल, गोऱ्हे व म्हशी) कत्तलखान्यात जाण्यापूर्वी सुटका करण्यात आली. तसेच ४६३ किलो अवैध गोमांस हस्तगत करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या जनावरांची आणि मांसाची किंमत सुमारे १५ लाख २३ हजार २३० रुपये इतकी आहे. याशिवाय, तपासादरम्यान अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली १४ वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत ४६,१०,००० रुपये आहे. संपूर्ण मोहिमेतील एकूण कारवाईची उलाढाल ६१ लाख ३३ हजार २३० रुपये इतकी मोठी आहे.
कडक कायद्याचा वापर
तस्करांविरुद्ध केवळ गुन्हे दाखल न करता, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारित) अधिनियम २०१५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कठोर कलमांचा वापर करण्यात आला आहे. जप्त केलेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागामार्फत दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे.
तस्करांना इशारा
जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, गोवंश हत्या आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही निरंतर सुरू राहतील, असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.



