Home Cities अमळनेर यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जड व वाळू वाहतूक बंद करा ; निवेदनातून मागणी

यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जड व वाळू वाहतूक बंद करा ; निवेदनातून मागणी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देशाची काशी आणि ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळख असलेल्या अमळनेर येथील संत श्री सखाराम महाराज यांचा यात्रोत्सव सध्या मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी अमळनेरमध्ये दाखल होत आहेत. मात्र, शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरून होणाऱ्या बेफाम जड वाहतुकीमुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, ही वाहतूक तातडीने बंद करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक पंकज पंडित चौधरी यांनी केली आहे.

या गंभीर विषयावर नगरसेवक चौधरी यांनी अमळनेरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, सध्या अमळनेर शहरात पैलाड ते धुळे रोड या मार्गावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवैध आणि अवजड वाळू व गौण खनिजाची वाहतूक सुरू आहे. हे वाळूचे डंपर अत्यंत वेगाने शहरातून धावत असून, यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यात्रोत्सवाच्या निमित्ताने शहरात रात्रभर भाविकांची मोठी वर्दळ असते. अशा संवेदनशील वातावरणात भरधाव वेगाने जाणारे डंपर सामान्यांच्या जिवावर बेतू शकतात. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी जळगाव आणि अमळनेर पोलीस स्टेशनलाही माहितीसाठी पाठवण्यात आली आहे.

“भाविकांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. यात्रेच्या काळात प्रशासनाने वेळीच पावले उचलून ही वाहतूक थांबवली नाही आणि यादरम्यान काही दुर्घटना घडली, तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील,” असा स्पष्ट इशारा पंकज चौधरी यांनी दिला आहे. आता यात्रेच्या सांगतेपर्यंत प्रशासन ही जड वाहतूक पूर्णतः बंद ठेवून भाविकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देते का, याकडे संपूर्ण अमळनेरवासीयांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound