जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शाळेत जाणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये संशयित आरोपी गौरव हेमंत कोळी याच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी जामनेर तालुक्यातील एका गावात शिक्षण घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून संशयित आरोपी गौरव कोळी हा तिचा विनाकारण पाठलाग करत होता. मुलगी शाळेत जात असताना किंवा घरून बाहेर पडल्यावर तो तिला रस्त्यात आडवा उभा राहून, तिला डोळा मारणे आणि तिच्याकडे पाहून अश्लीलपणे हसणे अशा हालचाली करून तिचा विनयभंग करत होता. इतकेच नाही तर आरोपीने पीडितेच्या मोबाईलवर वारंवार फोन करून तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती.

पीडितेने आणि तिच्या कुटुंबीयांनी या त्रासाला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांना उघडपणे धमकावले. “तुझे आणि माझे अफेअर आहे असे मी सर्वांना सांगेन, तुझ्या भावांना गायब करून टाकेल,” अशी धमकी देऊन त्याने पीडितेच्या मनात दहशत निर्माण केली होती. तसेच पीडितेच्या नातेवाईकांनाही ‘तुम्हाला जे करायचे ते करा’ असे उद्धटपणे आव्हान दिले. अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेच्या आईने जामनेर पोलीस स्टेशन गाठले. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



