जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी एक विशेष मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्यासाठी व अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी २ मे रोजी रात्री ९ ते ११ वाजेच्या दरम्यान जिल्ह्यात ‘सर्च ऑपरेशन’ राबवण्यात आले.
या विशेष मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आपापल्या अधिपत्याखाली विशेष पथके तयार केली होती. या पथकांनी अचानकपणे जिल्ह्यातील विविध बार, हॉटेल्स आणि धाब्यांवर छापे टाकले. या धडक कारवाईत पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर अवैध बाबींचा पर्दाफाश केला आहे.

कारवाईचा तपशील:
मोहिमेदरम्यान २१३ हॉटेल्स आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली. यात एनडीपीएस (NDPS) अंतर्गत ०१ गुन्हा दाखल करण्यात आला असून, दारूबंदी कायद्यान्वये ११६ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच, कारवाईदरम्यान एक तलवार जप्त करण्यात आली असून, २ अनधिकृत हॉटेल्स निष्कासित करण्यात आली आहेत. प्रतिबंधक कारवाई अंतर्गत ४७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, ४-३३/डब्ल्यु नुसार ४, ५-मोटार वाहन कायद्यानुसार ५ आणि ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’ प्रकरणी १ अशा एकूण १० इतर कारवाया करण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली. या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.



