Home आरोग्य रावेर ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू; आ. अमोल जावळे यांच्या प्रयत्नांना यश 

रावेर ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू; आ. अमोल जावळे यांच्या प्रयत्नांना यश 


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारी आरोग्य सेवा उपलब्ध झाली असून महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने रावेर ग्रामीण रुग्णालयात नव्याने उभारण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अमोल जावळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही सुविधा मंजूर झाली असून, स्थानिक रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.

रावेर शहर व परिसरातील किडनीविकारग्रस्त रुग्णांना यापूर्वी डायलिसिससाठी जळगाव किंवा बुऱ्हानपूर येथे जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि पैशाचा मोठा खर्च होत होता. या अडचणी लक्षात घेऊन रुग्णांना स्थानिक पातळीवरच उपचार मिळावेत या उद्देशाने आमदार अमोल जावळे यांनी डायलिसिस सेंटर उभारणीसाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळत अखेर रावेर ग्रामीण रुग्णालयात ही सुविधा सुरू झाली आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण राज्यात विविध आरोग्य प्रकल्पांचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले, त्यात रावेरच्या डायलिसिस सेंटरचाही समावेश होता. उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी आपल्या भाषणातून आरोग्यमंत्री आणि आमदार अमोल जावळे यांचे आभार व्यक्त करत ही सुविधा रुग्णांसाठी जीवनदायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

ऑनलाईन उद्घाटनानंतर स्थानिक पातळीवरही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा संगीता महाजन, नगरसेवक राजेश शिंदे, सीमा जमादार, प्रमिला पाटील, योगिता महाजन, अर्चना पाटील, अमोल पाटील, पद्माकर महाजन, दिलीप पाटील तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार दीपा जेधे, नायब तहसीलदार संजय तायडे, गटविकास अधिकारी विनोद मेढे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पद्माकर महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना भविष्यात उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्नही मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमास विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले, तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव गिरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

नवीन सुरू झालेल्या या डायलिसिस सेंटरमध्ये एकाच वेळी पाच रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता असून, ही सुविधा पूर्णपणे शासकीय स्तरावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound