Home Cities मुक्ताईनगर कै. निखिलभाऊ खडसे स्मृतीदिनानिमित्त चांगदेव येथे जनसागर; स्मृतीस्थळी भावपूर्ण अभिवादन

कै. निखिलभाऊ खडसे स्मृतीदिनानिमित्त चांगदेव येथे जनसागर; स्मृतीस्थळी भावपूर्ण अभिवादन


मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीचे माजी चेअरमन कै. निखिलभाऊ एकनाथराव खडसे यांच्या स्मृतीदिनानिमित्त चांगदेव शिवारात रविवारी भावपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम पार पडला. स्मृतीस्थळी नागरिकांची मोठी गर्दी उसळली असून, आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी जनसागर लोटल्याचे चित्र पाहायला मिळाले.

चांगदेव शिवारातील आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी परिसरात उभारलेल्या स्मृतीस्थळावर सकाळी सामूहिक अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी पुष्पचक्र अर्पण करून कै. निखिलभाऊ खडसे यांच्या कार्याला आणि त्यांच्या साध्या, प्रेमळ स्वभावाला उजाळा दिला. कार्यक्रमादरम्यान वातावरण अत्यंत भावनिक झाले होते, तर अनेक जुने सहकारी आणि कार्यकर्ते भाऊंच्या आठवणींनी भारावून गेले होते.

कै. निखिलभाऊ खडसे यांनी आपल्या कार्यकाळात सहकार क्षेत्रात तसेच सामाजिक कार्यात भरीव योगदान देत तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला होता. सामान्य माणसाच्या हितासाठी त्यांनी नेहमीच कार्य केले आणि त्यांची कार्यपद्धती आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांच्या योगदानाचे स्मरण केले.

या कार्यक्रमास विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, खडसे परिवारातील सदस्य, मित्रपरिवार आणि मोठ्या संख्येने शुभचिंतक उपस्थित होते. सकाळपासूनच परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ होती, ज्यातून भाऊंबद्दल असलेले प्रेम आणि आदर स्पष्टपणे दिसून येत होते.


Protected Content

Play sound