Home Cities जळगाव “एका गव्हाच्या दाण्यावर अवघा महाराष्ट्र; सुनील दाभाडे यांची जादुई कला!”

“एका गव्हाच्या दाण्यावर अवघा महाराष्ट्र; सुनील दाभाडे यांची जादुई कला!”


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने जळगावातील चित्रकार सुनिल दाभाडे यांनी गहूच्या एका सूक्ष्म दाण्यावर महाराष्ट्राची ओळख साकारत अनोखी मायक्रो पेंटिंग तयार केली असून या विलक्षण कलाकृतीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

चित्रकार सुनिल दाभाडे हे मानव सेवा विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी आपल्या कल्पकतेचा अनोखा आविष्कार सादर करत अत्यंत लहान गव्हाच्या दाण्यावर महाराष्ट्राचा नकाशा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची प्रतीके, ऐतिहासिक किल्ले आणि राज्याच्या सांस्कृतिक वारशाचे विविध घटक अत्यंत बारकाईने रेखाटले आहेत. या सूक्ष्म कलाकृतीमुळे त्यांच्या कौशल्याची प्रचिती येत असून पाहणारेही थक्क होत आहेत.

अवघ्या एका दाण्यावर इतक्या सूक्ष्म आणि प्रभावी पद्धतीने चित्र रेखाटणे हे अत्यंत कठीण काम मानले जाते. मात्र, दाभाडे यांनी संयम, कौशल्य आणि सर्जनशीलतेच्या जोरावर ही कलाकृती साकारली आहे. या माध्यमातून त्यांनी ‘महाराष्ट्र माझा, अभिमान माझा’ हा संदेश प्रभावीपणे मांडला आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तयार झालेली ही कलाकृती राज्याच्या समृद्ध परंपरेला अनोखी मानवंदना ठरत आहे.

या कलाकृतीचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस. डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि कला रसिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. दाभाडे यांच्या या कलाकृतीमुळे जळगावच्या कलाक्षेत्राला एक वेगळी ओळख मिळाली असल्याची भावना व्यक्त होत आहे.

ही मायक्रो पेंटिंग केवळ एक कलाकृती नसून महाराष्ट्राच्या इतिहास, संस्कृती आणि अभिमानाचे प्रतीक बनली आहे. दाभाडे यांच्या या उपक्रमामुळे नवोदित कलाकारांनाही प्रेरणा मिळत असून भविष्यात अशा अधिक सर्जनशील कलाकृती पाहायला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound