Home आरोग्य गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘लोकसेवा हक्क दिन’ उत्साहात 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘लोकसेवा हक्क दिन’ उत्साहात 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे २८ एप्रिल २०२६ रोजी ‘लोकसेवा हक्क दिन’ मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लोकसेवेविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच शासनाच्या विविध सेवांबाबत माहिती देणे आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना दृढ करणे हा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, ई अँड टीसी विभाग प्रमुख डॉ. हेमंत इंगळे तसेच संगणक विभागाचे प्रा. निलेश वाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. नकुल गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लोकसेवा हक्क दिन’ निमित्त शपथविधी पार पडला. या शपथविधीत विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जबाबदारीने नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडण्याची ग्वाही दिली.

यानंतर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध विषयांवर प्रभावी भाषणे सादर केली. निधी बैसाने, दिया चौधरी आणि जिज्ञासा पाटील यांनी सार्वजनिक सेवांचे महत्त्व, प्रशासनातील पारदर्शकता, डिजिटल युगातील सेवा, नागरिकांची भूमिका आणि युवकांचा राष्ट्रनिर्मितीत असलेला वाटा यावर सखोल विचार मांडले. त्यांच्या भाषणांनी उपस्थितांमध्ये जागरूकता आणि प्रेरणा निर्माण केली.

अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ‘लोकसेवा हक्क दिना’चे महत्त्व स्पष्ट करत शासनाच्या सेवा नागरिकांना ठराविक कालमर्यादेत, पारदर्शक आणि उत्तरदायी पद्धतीने मिळणे हा या कायद्यामागील मुख्य हेतू असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता समाजव्यवस्था, शासन यंत्रणा, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये यांची जाण ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

भविष्यातील अभियंते, प्रशासक आणि जबाबदार नागरिक म्हणून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, शिस्त, कर्तव्यदक्षता आणि समाजसेवेची मूल्ये आत्मसात करावीत, असा संदेशही त्यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी चोपडे यांनी आत्मविश्वासपूर्ण शैलीत केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि समन्वय प्रा. नकुल गाडगे यांनी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडले.

कार्यक्रमास प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सभागृहात उत्साह, सकारात्मक ऊर्जा आणि सामाजिक बांधिलकीची भावना अनुभवास येत होती. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढण्यास, लोकशाही मूल्यांची समज विकसित होण्यास आणि सार्वजनिक व्यवस्थेविषयी आदर निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील तसेच डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.


Protected Content

Play sound