पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लग्नाची पत्रिका सर्वप्रथम आदिशक्ती सप्तश्रृंगी मातेच्या चरणी अर्पण करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतत असताना पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाजवळ चारचाकीचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय भावी वधूसह ४२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
अमरावती जिल्ह्यातील हरम (ता. अचलपूर) येथील शुभम बेलसरे, सुनील मानकर, शिका बेलसरे आणि मिनाताई सुनील बेलसरे हे ८ मे रोजी होणाऱ्या शिका बेलसरे यांच्या विवाहाची पत्रिका सप्तश्रृंगी मातेच्या चरणी अर्पण करण्यासाठी वणी गड येथे गेले होते. दर्शन घेऊन मंगळवारी (२९ एप्रिल) पहाटे ते चारचाकीने गावी परतत असताना सकाळी सुमारे आठ वाजेच्या सुमारास बांबरुड महादेवाजवळ अचानक वाहनाचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून वाहन रस्त्याच्या कडेला घसरले आणि भीषण अपघात झाला.

या अपघातात मिनाताई मानकर (वय ४२) यांचा जागीच मृत्यू झाला, तर विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या शिका बेलसरे (वय २२) गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस, जय मल्हार रुग्णवाहिका चालक बबलू मराठे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. यावेळी नाशिककडे जात असलेले गोराडखेडा येथील सरपंच मनोज (आप्पा) पाटील यांनीही थांबून जखमींना मदत केली.
शिका बेलसरे यांना पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगावकडे हलवित असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. लग्नाच्या अवघ्या काही दिवसांपूर्वीच भावी वधूचा झालेला मृत्यू कुटुंबासाठी असह्य धक्का ठरला आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वाहनाचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
एकीकडे विवाहसोहळ्याच्या तयारीत रमलेले कुटुंब, सप्तश्रृंगी मातेच्या आशीर्वादासाठी गेले आणि परतीच्या वाटेवर नियतीने घात केला. लग्नाची स्वप्ने डोळ्यांत साठवलेल्या तरुणीचा असा अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.



