जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी असून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या वतीने चाळीसगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि. ५ मे रोजी सकाळी १० वाजेपासून प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये क्वेस कॉर्प प्रा. लि., पुणे तसेच युवाशक्ती फाउंडेशन, जळगाव यांसारख्या कंपन्या सहभागी होणार असून पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी मिळणार आहे.
या रोजगार मेळाव्यासाठी १०वी, १२वी, बी.कॉम., एम.कॉम. तसेच इतर पदवीधर उमेदवार पात्र आहेत. इच्छुकांनी महास्वयंम पोर्टलवर नोंदणी करून युजर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने लॉग इन करत उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या उमेदवारांनी अद्याप ऑनलाईन नोंदणी केलेली नाही, अशा उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव येथे संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.



