रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या शेतमाल आणि शेती उपयोगी साहित्य चोरीच्या वाढत्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या रावेर तालुक्यात निंभोरा पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत चोरट्याला अटक केली आहे. विवरा बुद्रुक येथील शेतातील हळद चोरी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी आरोपी विलास सुपडू वाघोदे उर्फ काल्या याला शिताफीने जेरबंद केले असून त्याच्याकडून 70 हजार रुपये किमतीची 320 किलो बॉईल्ड हळद जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
निंभोरा, सावदा, चिनावल, रावेर, मुक्ताईनगर आणि यावल परिसरात गेल्या काही महिन्यांपासून शेतातील मोटारी, वायर, पाण्याचे पाईप तसेच केळी, हळद, मका यासारख्या शेतमालाच्या चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाले होते. दरम्यान, 26 एप्रिल रोजी विवरा बुद्रुक येथील शेतकरी संजय कुंडलिक चौधरी यांनी त्यांच्या शेतातील हळद चोरीला गेल्याची आणि त्यामागे विलास वाघोदे उर्फ काल्या याच्यावर संशय असल्याची फिर्याद निंभोरा पोलीस ठाण्यात दिली होती.

या फिर्यादीवरून निंभोरा पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा रजिस्टर क्रमांक 79/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासासाठी निंभोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी श्रीमती मीरा देशमुख यांनी वरिष्ठ अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती दिली.
तांत्रिक आणि आधुनिक पद्धतीने तपास विश्लेषण करत पोलिसांनी आरोपीचा माग काढला. वडगाव शिवारातील एका शेतात आरोपी लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचून त्याचा पाठलाग केला. प्रभारी अधिकारी मीरा देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे तसेच सतीश सानप, विजू जावरे, अविनाश पाटील, सुभाष शिंदे, किरण जाधव, राहुल केदारे, परेश सोनवणे आणि ज्योती पाटील यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपीला अटक केली.
अटकेनंतर आरोपीकडून बॉईल्ड हळदीच्या प्रत्येकी 40 किलो वजनाच्या आठ गोण्या, एकूण 320 किलो हळद हस्तगत करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या या मुद्देमालाची किंमत सुमारे 70 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आरोपी विलास वाघोदे उर्फ काल्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात निंभोरा, सावदा, रावेर आणि यावल पोलीस ठाण्यांत 25 ते 30 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वीही त्याच्याकडून तब्बल 12 लाख रुपये किमतीचे शेती उपयोगी साहित्य आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. विविध गुन्ह्यांमध्ये आणि न्यायालयीन वॉरंटमध्ये तो मागील दोन-तीन महिन्यांपासून फरार होता.



