धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव बसस्थानकातील विद्यार्थी पास कक्ष गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रवासी आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली ही महत्त्वाची सेवा बंद असल्याने दररोज जळगाव, अमळनेर, चोपडा, पारोळा तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सवलतीच्या पासऐवजी पूर्ण भाडे भरून प्रवास करावा लागत असून आर्थिक भुर्दंडासोबत शैक्षणिक अडचणीही निर्माण होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव बसस्थानकातील विद्यार्थी पास कक्ष उत्पन्नाच्या कारणावरून एरंडोल येथील स्थानक प्रमुख व आगार व्यवस्थापकांनी बंद ठेवला असल्याचा आरोप होत आहे. मात्र, ही भूमिका विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा आणणारी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे एसटी महामंडळ हे प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी असून विद्यार्थ्यांना 66.66 टक्के सवलत मिळते. या सवलतीपोटी शासन महामंडळाला रक्कमही अदा करत असताना विद्यार्थ्यांना पूर्ण भाडे भरावे लागणे हा अन्याय असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

दररोज आयटीआय, वरिष्ठ महाविद्यालये, शॉर्टहँड, टायपिंग तसेच इतर शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी धरणगावातून प्रवास करतात. अशा परिस्थितीत पास कक्ष बंद असल्याने नवीन पास काढणे, नूतनीकरण करणे किंवा शंका निरसन यासाठी विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या पासची मुदत वेगवेगळ्या दिवशी संपत असल्याने पास कक्ष नियमित सुरू ठेवणे आवश्यक असताना तो बंद ठेवण्यात आल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
विद्यार्थी आणि पालकांनी याबाबत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पास कक्ष बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे दररोजचे अतिरिक्त प्रवासखर्च वाढले असून ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांवर याचा अधिक परिणाम होत आहे. यामुळे काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नियमित ये-जा करणे कठीण बनले आहे.
एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या सवलत योजनांचा उद्देश शिक्षण सुलभ करणे हा आहे. मात्र, प्रत्यक्षात सेवा बंद असल्याने शासनाच्या उद्दिष्टालाच हरताळ फासला जात असल्याची टीका होत आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी असलेली सेवा उत्पन्नाच्या निकषावर बंद ठेवणे योग्य नसल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर एरंडोल आगार व्यवस्थापकांनी तातडीने निर्णय घेऊन धरणगाव बसस्थानकातील विद्यार्थी पास कक्ष नियमित सुरू करावा, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबवून त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होणार नाहीत यासाठी त्वरित पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



