जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात पर्यावरण संरक्षणाला चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ ग्रीनसिटीच्या वतीने “पर्यावरण संवर्धन अभियान” उत्साहात सुरू करण्यात आले आहे. पर्यावरण महिन्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाची सुरुवात पोस्टर अनावरण आणि पर्यावरण शपथ घेऊन करण्यात आली असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रिंग रोडवरील वेव्ज क्लासेस येथे झालेल्या या कार्यक्रमात आ. राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाचा पहिला टप्पा पार पडला. यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धन हेच शाश्वत विकासाचे मूळ असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. शहर हरित आणि स्वच्छ बनविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

या अभियानात जनजागृती, अंमलबजावणी आणि पाठपुरावा अशा तीन टप्प्यांमध्ये काम केले जाणार असल्याची माहिती क्लबचे सचिव अभय कुलकर्णी यांनी दिली. विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याचे आवाहन करत पोस्टरवरील नियमांचे पुनर्वाचन करण्यात आले आणि सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.
कार्यक्रमादरम्यान क्लबच्या अध्यक्षा धनश्री ठाकरे, खजिनदार डॉ. भावना चौधरी, प्रा. ए. टी. चौधरी तसेच सदस्य समीर रोकडे, अर्चना माळी, डॉ. पूजा वाघ, प्रवीण सपकाळे, विकास निकम आणि अभिजित चौधरी यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत मार्गदर्शन करत जनजागृतीपर साहित्याचे वितरण करण्यात आले.
नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हे अभियान अधिक प्रभावी होईल आणि जळगाव शहर हरित व स्वच्छ बनविण्यात यश मिळेल, असा विश्वास आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे पर्यावरणाबाबतची जबाबदारी नागरिकांमध्ये अधिक दृढ होईल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. भावना चौधरी यांनी मानले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, पुढील टप्प्यांमध्ये अधिक व्यापक प्रमाणावर जनजागृती केली जाणार आहे.



