Home Cities जळगाव शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय नाही – पालकमंत्री गुलाबराव पाटील  

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय नाही – पालकमंत्री गुलाबराव पाटील  


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर जळगाव आणि धरणगाव तालुक्यांसाठी आयोजित पूर्वनियोजन आढावा बैठकीत शेतकरी हिताला प्राधान्य देत बोगस बियाणे, खते व कीटकनाशके विकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांची फसवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नसल्याचा सज्जड इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.

जिल्हा परिषद जळगाव येथील श्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात पार पडलेल्या या संयुक्त बैठकीत बदलत्या हवामान परिस्थितीचा आढावा घेत खरीप हंगामातील संभाव्य आव्हानांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी शाश्वत आणि शास्त्रशुद्ध शेती पद्धती स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी विभागाने संवेदनशीलतेने काम करत शेतकऱ्यांचा विश्वास जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर मशागतीची कामे सकाळच्या वेळेत करण्याचा सल्ला देताना त्यांनी बदलत्या निसर्गचक्रामुळे धूळपेर टाळून बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे स्पष्ट केले. एकाच पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक आणि मिश्रपीक पद्धतीचा अवलंब करण्यावर त्यांनी भर दिला.

अनधिकृत कंपन्यांच्या आमिषांना बळी न पडण्याचा सल्ला देत त्यांनी शेतकऱ्यांना केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे व खते खरेदी करण्याचे आणि पक्के बील जतन करण्याचे आवाहन केले. तसेच कृषी अधिकाऱ्यांनी नियमित शेतभेटी देऊन मार्गदर्शन करावे आणि गावपातळीवर युवक व महिलांनी शेतकरी गट स्थापन करून प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीदरम्यान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत जळगाव व धरणगाव तालुक्यातील 34 शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले. प्रतिनिधिक स्वरूपात पंकज सुपडू सोनवणे, अनिता शांताराम पाटील आणि विनायक कोळी यांना अनुदानाचे धनादेश प्रदान करण्यात आले.

याच कार्यक्रमात आदर्श शेतकरी म्हणून योगेश झांबरे यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी गावपातळीवर प्राथमिक प्रक्रिया उद्योग उभारून रोजगारनिर्मिती केली आहे. तसेच गोकुळ लंके आणि सुरेश पाटील यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्रात प्रगती साधल्याबद्दल गौरविण्यात आले. यावेळी ट्रॅक्टर वाटप आणि शेतकरी गटांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी स्नेहल थेऊरकर आणि प्रशांत देसाई यांनी आपल्या-आपल्या तालुक्यांतील खरीप नियोजनाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुर्बान तडवी यांनी केले.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, कृषी विकास अधिकारी पद्मनाभन मस्के, उपविभागीय कृषी अधिकारी हर्षदा देसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मिलिंद चौधरी, गोकुळ चव्हाण, गजानन पाटील, डी. ओ. पाटील यांच्यासह प्रगतशील शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound